आई-वडिलांच्या कष्टाचं दिलं फळ; लाखाच्या नोकरीला लाथ मारत पल्लवी बनली अधिकारी

Pallavi Chinchkhede
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसरात्र काबाड कष्ट करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण असलेल्या त्यांच्या लाडक्या लेकीनं त्यांची इच्छा अखेर पूर्ण केली. उच्च शिक्षण असून चांगली नोकरी असताना देखील लेकीनं त्या नोकरीवर लाथ मारत अधिकारी होण्याचं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील पल्लवी देविदास चिंचखेडे हिने बाजी मारत देशात 63 वी रॅंक मिळवला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून जाणून घेऊया पल्लवीच्या जिद्दीची कहाणी…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने यश मिळवले आहे. उच्च शिक्षण असूनही केवळ शासकीय आणि उच्च पदावर अधिकारी होण्याचं स्वप्न पल्लवीने पूर्ण केले. पल्लवीने अमरावती येथे आपले बी इ मेकॅनिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी टीका एक लाख रुपयांपर्यंत पगार मिळू लागला. नोकरी करत असताना देश सेवा करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. त्यामुळे लाख रुपये पगाराच्या नोकरीचा तिने राजीनामा दिला आणि दिल्ली येथे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

आई – वडिलांच्या कष्टाचे केले चीज

अधिकारी बनलेल्या पल्लवीच्या कुटूंबीयांबाबत सांगायचे झाले तर पल्लवीचे वडील हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आई घरात शिवणकाम करते. पल्लवीची बहिण ही एका बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असून भाऊ कॉलेज विद्यार्थी आहे. मुलगी अधिकारी होण्याचे स्वप्न बघितलेल्या आईवडिलांच्या कष्टाचे पल्लवीने चीज केले आहे.

लाखाच्या नोकरीला लाथ मारून गाठली दिल्ली

नोकरीसाठी अमरावतीच्या राहुल नगर, बिच्छू टेकडी या ठिकाणी पल्लवी राहत होती. ती राहत असलेल्या ठिकाणी व्यसनाधीनतामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य खराब झालेले तिने पाहिले. यावेळी तिने आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करावं हे ठरवले. तिने IAS होण्याची जिद्द केली. आणि येथूनच सुरु झाला पल्लवीचा अधिकारी होण्याचा प्रवास. या ठिकाणी राहून अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही तसेच अभ्यासही करता येणार नाही हे पल्लवीने ओळखलं. आणि तिने थेट परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली गाठली.

असा सुरु झाला UPSC चा प्रवास

पल्लवीचे शिक्षण आनंद शाळेमधून झाले असून तिने अमरावतीतूनच शिक्षण पूर्ण केले आहे. पदवी पूर्ण करताना तिला कमी गुण मिळाले होते. समाजातील विविध प्रश्नांची झालेली जाणीव असल्याने ते प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी करू शकतो असं तिला वाटलं. त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी तिने केली. काहीही झालं तरी IAS व्हायचंच असे मनाशी पक्क करत पल्लवीने अभ्यास सुरु केला. पुढे आपल्या अभ्यासात सातत्य ठेवत अपार मेहनत घेत तिने संपूर्ण भारतातून 63 वा क्रमांक मिळवत IAS पदावर मजल मारली.