जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर; कोर्टाचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील ‘हर हर महादेव’ चित्रपटावेळी झालेल्या मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .

मॉलमधील मारहाण प्रकरणी कोर्टाने जितेंद्र आव्हाड याना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांनी जामीन अर्ज दाखल केला. यावेळी पार पडलेल्या सुनावणी वेळी आव्हाड याना जामीन देण्यास तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांनी विरोध केला. जामीन मिळाल्यानंतर आव्हाड साक्षीदारांना धमकावू शकतात तसेच तपासामध्ये अडथळे निर्माण करू शकतात असा अभिप्राय सरकारी वकिलांनी केला. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे .

नेमकं काय आहे प्रकरण –

ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहामध्ये सोमवारी रात्री ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू होता. शो सुरू असताना, अचानक जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसोबत चित्रपटगृहामध्ये गेले आणि या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करत शो बंद पाडला. चित्रपटाचा शो बंद झाल्याने प्रेक्षक चित्रपटगृहातील स्क्रीनजवळ जमले. त्यावेळी कोणीतरी चित्रपट बंद पाडत आहात तर आमचे पैसे परत देण्याची मागणी केली. त्यांनतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी काही प्रेक्षकांना मारहाण केल्याची तक्रार ठाण्यातील व्यावसायिक परीक्षित दुर्वे यांना केली होती.