Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली; भाविकांवर काळाचा घाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याची (Pandharpur Bus Accident) दुर्दैवी घटना आज मुंबई-पुणे महामार्गावर घडली. या अपघात ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रॅव्हल बस ही डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होती. मात्र याचवेळी मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळली आणि दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. त्यातील ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीहुन एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. त्याच दरम्यान, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली. या अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

यंदाची आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. याच निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी डोंबिवली मधून हे सर्व भाविक मोठ्या उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने जात होते. परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला. आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात. ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही, ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात. लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते आणि विठुरायाचा गजर सर्वत्र दुमदुमत असतो.