पंकजा मुंडेंच्या शुभेच्छांवर धनंजय मुंडेंची दमदार उत्तर; कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दोन्ही नेत्यांना गहिनीनाथ गडाने (Gahininath Gad) एकाच मंचावर आणलं. वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर पार पडला. या सोहळ्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित केलं. या व्यासपीठावरुन बोलताना पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. तर धनंजय मुंडे यांनीही जिल्ह्याचा विकास आपल्या खांद्यावर घेतल्याचं सांगितलं.

पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जयदत्त क्षीरसागर, राम शिंदे आणि आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी बराच निधी दिल्याचा दावा यावेळी पंकजा मुंडे यांनी केला. पण यावेळी कुठला मंत्री किंवा नेता म्हणून नाही तर भक्त म्हणून गहिनीनाथ गडावर आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. आज देण्यासाठी आपल्याकडे काही नाही. त्यामुळे फक्त प्रेम द्यायला आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. आजवर जे देता आलं ते दिलं. तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं केलं. मुंडे साहेबांनी दिलेला स्वाभिमानाचा कणा वाकू दिला नाही, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. आमच्या हातात जे होतं ते आम्ही केलं. आता पुढची पाच वर्षे विकास करण्यासाठी नव्या हातांमध्ये सत्ता आली आहे. ते जिल्ह्याला विकासाची कमी भासू देणार नाहीत, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

‘जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो’
संत वामनभाऊंवर, गडांच्या भक्तांवर, या सर्वांवर आपण असंच प्रेम आणि आशिर्वाद ठेवा. या गडाची, या मतदारसंघाची आणि बीड जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या खांद्यावर घेतो, असं धनंजय मुंडे म्हणाले. अनेक वर्ष आपला जिल्हा पिछाडीवर आहे. आपल्या जिल्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून संबोधलं जातं. मात्र येणाऱ्या या चार वर्षात जिल्ह्याच्या समोरचं मागासलेपण हटवून, ऊसतोड मजुरांचा नाही तर ऊस पिकवणाऱ्यांचा जिल्हा अशी ओळख देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे, असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिलं.

अनेक संकटं येतात जातात, मी कुठल्या संकटाला घाबरलो नाही. आताच्या संकटाचा उल्लेखसुद्धा एका महंतांनी केला. अशी किती जरी संकटं आली, तरी जनतेच्या मनात आपण स्थान निर्माण केलं असेल तर आशिर्वाद कधीच कमी पडत नाही. आजच्या या संकटातसुद्धा तुमचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत. देव तारी त्याला कोण मारी, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. जगातलं कुठलं मोठं पद, भविष्यात कोणतं महत्त्वाचं पद मिळेल की नाही माहित नाही, पण पुण्यतिथीच्या पूजेचं, या पवित्र पूजेची जबाबदारी जी तुम्ही दिली, आयुष्यात माझ्यासाठी सर्वात मोठं पद कोणतं असेल तर ती पुण्यतिथीची पूजा आहे, ती मला आज या गडातून मिळालं. यापेक्षा जास्त काही बोलणार नाही. माजी पालकमंत्री म्हणाल्या आता आमची जबाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या. त्यांना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू, असा टोमणा धनंजय मुंडे यांनी पंकजांना लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment