हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) याना बीड लोकसभा मतदारसंघातून अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत ते बीडच्या राजकारणातील जायंट किलर ठरले होते. पंकजा यांच्या पराभवनंतर बीडमधील त्यांच्या २-३ कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या सुद्धा केल्या. या एकूण सर्व घडामोडींनी बीडचे राजकारण ढवळून निघालं आहे. त्याच दरम्यान, आता पंकजा मुंडे याना भाजप राज्यसभेवर (Rajya Sabha) पाठवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा देखील केली असल्याचे बोललं जातंय.
पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे दोन्ही राज्यसभा खासदार लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यातच महत्वाची बाब म्हणजे सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु आहे. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्या मानल्या जातात. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेण्यात यावं अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून केली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत अशी मागणी केंद्रीय नेतृत्वाला बोलूनही दाखवण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे यांची साथ… गोपीनाथ मुंडे याना मानणारा भलामोठा वर्ग आणि स्वतःचा स्वतंत्र असा फॅनबेस असतानाही पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभेत धक्कादायक पराभव झाला. मराठा आंदोलनाचा फटका पंकजा मुंडे याना बसल्याचे बोललं जात आहे. मराठा मतदार हा भाजपपासून लांब गेलाय, मात्र ओबीसी मतदाराने भाजपला साथ दिली आहे. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन करून पक्षाला जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो.