परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
राज्यभरात कोरोनाचा थैमान सुरु असताना आता परभणीहून एक दिलासादायक बातमी आली आहे. परभणी जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली असून संपूर्ण जिल्हा करोनामुक्त केल्याबद्दल त्यांनी आरोग्य यंत्रणेचे आभार मानले आहेत.
परभणी जिल्हा सुरुवातीपासूनच करोनामुक्त होता. मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. त्या रुग्णाच्या कुटुंबाला क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने जिल्हयात खबरदारी घेतली होती. ‘त्या’ रुग्णाचा पहिला आणि आज दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला आहे, असं पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान, आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात १९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे.