परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधामध्ये एकीकडे देशभर आंदोलन चालू आहे. असं असताना आता परभणीत भाजप आणि समर्थित संघटना या विधेयकाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. परभणीमध्ये केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्याच्या समर्थनासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या करून एक लाख स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे.
परभणी शहरातील गांधी पार्क, जिंतूर रोड आणि विद्यापीठ परिसर या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला या कायद्याविषयी माहिती देऊन कायद्याच्या समर्थनात त्यांची स्वाक्षरी घेत आहेत. परभणी भाजपच्यावतीने सुरु करण्यात आलेली ही मोहीम, पुढील एक आठवडाभर चालणार आहे.
जवळपास १ लाख लोकांची स्वाक्षरी केलेले निवेदन, राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. तर येणाऱ्या सोमवारी कायद्याच्या समर्थनाथ मोर्चाही काढण्यात येणार असल्याची माहिती या स्वाक्षरी मोहीम आयोजकांनी यावेळी दिली आहे.