परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मागच्या आठवड्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन अंकी संख्येवर गेल्यानंतर काल सायंकाळी उशिरापर्यंत आकडा झपाट्याने वाढत गेला. शनिवार पर्यंत जिल्ह्यात बावीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या असताना रविवारी नांदेडहुन आलेल्या तपासणी अहवालानंतर रुग्णांची संख्या १४ ने वाढत आता ३६ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान आणखी दोनशे रुग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने जिल्हावाशीयांची धडधड वाढलेली आहे.
जिल्ह्यात रविवारी सायंकाळी नांदेड येथील प्रयोगशाळेतून आलेल्या कोरणा पॉझिटिव्ह अहवालाने एकच खळबळ उडाली. यावेळी जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल चौदा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात गंगाखेड तालुक्यातील ११ जणांचा समावेश असून परभणी तालुक्यात २ तर सेलू तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये परभणीतील १, माळसोन्ना मधील १,सेलू तालूक्यातील १ तर नागठाणा मध्ये ४ व माखणी गावातील सात जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मागील आठ दिवसांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासह जिल्हावाशीयांची चिंता वाढली आहे. त्यात हे सर्व रुग्णबाहेर जिल्ह्यातून आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून प्रयोग शाळेतील २०० तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने रुग्ण संख्या आणखी वाढण्याची भीती कायम आहे.