परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
मागील दोन दिवसापासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धावती भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांकडून आपल्या मागण्यांचे निवेदन विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले. या प्रश्नी वैयक्तिक लक्ष देईल असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.
आज परभणी मध्ये कृषी संजिवनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री बबनराव लोणीकर हे आले होते. विद्यापीठासमोरुन जाताना आंदोलनक विद्यार्थी यांना पाहून देवेंद्र फडणीस यांनी आंदोलन विद्यार्थ्यांची अनौपचारिक भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडली. विद्यार्थ्यांच्या मते ,मागील अनेक दिवसांपासून शिष्यवृत्ती मिळाली नसून फीमध्येही भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.
कृषी शिक्षणाचा व्यवसायिक दर्जाही काढून घेण्यात आला आहे तर ९० टक्के शेतकरी वर्गाची मुले याठिकाणी शिकत असून या ठिकाणी आता शिकावं की नाही? असा प्रश्न पडल्याचे विद्यार्थ्यांनी फडणवीसांना सांगितले, यावर आपण सरकारशी चर्चा करू आणि तुमच्या मागण्यांचा विचार करायला भाग पाडू असे आश्वासन देत आणि विद्यार्थ्यांचे निवेदन हातामध्ये घेऊन देवेंद्र फडणवीस पुढे निघून गेले. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.