जावली पुन्हा हादरलं..!! कोरोनाच्या दहशतीने आई-वडिलांनी १६ वर्षीय मुलाचा मृतदेह ३ दिवस घरातच ठेवला..त्यानंतर..?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोना संकटाच्या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. लॉकडाऊन काळात मुंबईहून आपल्या गावातील घरी पहिल्यांदाच रहायला आलेल्या जावली तालुक्यातील म्हाते खुर्द या गावात एक भयानक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांच्या आणि कोरोनाच्या भीतीने एका कुटुंबाने आपल्या १६ वर्षीय मुलाचा झालेला मृत्यू गावकऱ्यांपासून ३ दिवस लपवून ठेवला. अर्णव दळवी या आपल्या मुलाच्या मृतदेहासहित त्याचे आई आणि वडील घरामध्ये २ दिवस तसेच राहिले. शेवटी मृतदेहामध्ये जंतू झाल्याने तो कुजला आणि त्याची दुर्गंधी बाजूच्या परिसरात पसरली. यानंतरच गावकऱ्यांनाही या घटनेचा छडा लागला.

Satara

तब्बल ७२ तास या मृतदेहाला तसंच ठेवण्यात आल्याने त्या मृतदेहाचं जैविक विघटन सुरु झालं आणि दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला. अर्णव जयवंत दळवी, वय १६ असं मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचं नाव असून जिल्हा शासकीय रुग्णालयात या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. नियमानुसार कोरोना रुग्णाची तपासणी मृत्यूपश्चात २४ तासानंतर करता येत नसल्याने या मुलाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.

मुंबईहून आलेलं हे कुटुंबीय गावातील कुणाशीच बोलत नव्हतं, आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही जास्त माहिती देत नव्हतं असं आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आणि गावच्या सरपंच विमल दळवी यांनी सांगितलं. अर्णव हा मागील सात ते आठ महिन्यांपासून आजारी असल्याचं प्राथमिक माहितीनुसार समजलं आहे. म्हाते खुर्द हे गाव नुकतंच कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडलं आहे. अशा परिस्थितीत या कुटुंबियांनी या गंभीर परिस्थितीची कल्पना गावकऱ्यांना का दिली नाही हाच सवाल आता उपस्थित होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.