हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ये साला कप नामदे… यंदा आयपीएल आम्हीच जिंकणार असा विश्वास रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे (Royal Challenger Bangalore) चाहते नेहमीच करत असतात . मात्र दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडते. तस बघितलं तर आरसीबी हा प्रचंड फॉलोअर्स असलेला संघ, चिन्नास्वामी स्टेडियमवर सुद्धा प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षकांची गर्दी आणि पाठिंबा, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर, ग्लेन मॅक्सवेल यांसारखे दिग्गज खेळाडू संघात असूनही आरसीबीचा संघ आत्तापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर करू शकला नाही. यामागे एक-दोन नव्हे तर अनेक मोठी कारणे असू शकतात. मात्र याच दरम्यान, माजी खेळाडू पार्थिव पटेल (Parthiv Patel) ने बंगळुरू संघाच्या ड्रेसिंग रूम मधील खरं सत्य बाहेर आणत आत्तापर्यंत आरसीबी आयपीएल का जिंकू शकली नाही तेच सांगितलं आहे.
पार्थिव म्हणाला की आरसीबी लीगमध्ये कधीही संघ म्हणून खेळला नाही. विराट कोहली असो की ख्रिस गेल किंवा एबी डिव्हिलियर्स असो सर्वांची वयक्तिक कामगिरी चांगली राहीली. संघ सुद्धा याच खेळाडूंच्या अवतीभवती सतत राहिला. मी सुद्धा आरसीबीकडूनही खेळलो आहे, या फ्रँचायझीमध्ये स्टार्सना नेहमीच प्राधान्य दिले जात होते. यात मला संघभावना दिसली नाही. मी जेव्हा या फ्रँचायझीमध्ये होतो तेव्हा संघ म्हणजे फक्त विराट, गेल आणि डिव्हिलिअर्स हेच होते. आरसीबी मध्ये संघ संस्कृती कधीच नव्हती, त्यामुळे त्यांना आजपर्यँत आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही असं स्पष्ट मत पार्थिव पटेलने व्यक्त केलं.
दरम्यान, आयपीएल इतिहासातील सर्वात कमनशिबी संघ म्हणून रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडे बघावं लागेल. कारण आयपीएलच्या सुरुवातीपासून त्यांच्याकडे जॅक कॅलिस, तिलकरत्ने दिलशान, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, ब्रेन्डन मॅकल्म, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन यांच्यासारखे खेळाडू होते. मात्र तरीही आयपीएल जिंकण्यात या संघाला एकदाही यश आलं नाही. आत्तापर्यंत या लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नेहमीच खराब खेळ केला असे सुद्धा म्हणता येणार नाही. आरसीबीने ३ वेळा आयपीएल मध्ये अंतिम फेरी गाठली, परंतु दुर्दैवाने तिन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या लीगमध्ये, बंगळुरूचा संघ 8 वेळा ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलाय तर 6 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यश मिळवले होते, परंतु त्यांना एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.