कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना महामारीत तालुक्यातील प्रशासन काम करत आहे. पाटण पंचायत समितीही आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० लाख रूपये जमा करून योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी सभापती व उपसभापती एका महिन्याचे मानधन देणार आहेत. तर सदस्यांनीही एका महिन्याचे मानधन द्यावे, असे आवाहन सभापती राजाभाऊ शेलार यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण पंचायत समितीची ऑनलाईन मासिक सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती राजाभाऊ शेलार होते. यावेळी उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी व्ही. देर बी. विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण पंचायत समिती मार्फतही आपले योगदान म्हणून वेगळा निधी कसा मिळेल? याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावर विरोधी सदस्य पंजाबराव देसाई, संतोष गिरी यांनी आक्षेप घेत कोरोनासाठी स्वतंत्र निधी गोळा करण्याचा संकल्प चांगला आहे. मात्र आम्हाला विश्वासात का घेतले नाही? असा सवाल केला. त्यावरून दोन्ही गटात चांगलीच वादावादी झाली. या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी सोमवार २४ मे रोजी पंचायत समितीत बैठक आयोजित केली असून यावेळी सदस्यांबरोबरच अधिकाऱ्यांना संकल्पनेबाबत सविस्तर माहिती देण्याचे ठरले. याबाबत कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही सभापती शेलार यांनी केले. चाफळला कोरोना बाधितांची संख्या वाढत असून येथील डॉक्टरांना पाटण येथे ट्यूटी लावू नये, अशी मागणी सदस्या रूपाली पवार यांनी केली.