परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
कुठलाही निर्णय दोन्ही बाजू ऐकून घेतल्याशिवाय घेतला जाऊ शकत नाही ,आम्ही पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान आहे या मुद्द्यावर ठाम असून तसे पुरावे देण्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांप्रमाणे बैठकीच आमंत्रण दिलं नाही, आमची बाजूही ऐकून घेतली नाही त्यामुळे आता आम्हाला आमचे पुरावे घेऊन न्यायालयाचा दरवाजा ठोठावला लागेल. प्रसंगी आम्ही न्यायालयातही जाऊ असं मोठ वक्त्यव्य आज श्री साईबाबा जन्मभूमी कृती समितीचे अध्यक्ष व विश्वस्त आ. बाबाजानी दुर्रानी यांनी केलं आहे. त्यामुळे साई जन्मभूमीचा वाद संपला असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले असले तरी पाथरीकरांच्या वतीने विषय अजून संपलेला नाही .
बाबाजानी दुर्रानी यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना असे म्हटले की, स्वतः मुख्यमंत्र्यांनी साई जन्मभूमीसाठी विकासासाठी निधी घोषित केला आहे. या विषयावर शिर्डीकरांनी वाद केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू ऐकून घेणे अपेक्षित होते. आमचे पुरावे व बाजू ऐकून घ्या असं सांगण्यासाठी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु आमची बाजू ऐकण्यासाठी वेळ व आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कृती समितीने याविषयी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालयाकडून तुमची काय अपेक्षा आहे असा पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर ते म्हणाले की, न्यायालयामध्ये आमच्याकडे असणारे शासकीय व निमशासकीय पुरावे आहेत ते सादर करू. आम्ही न्यायालयाला अशीही विनंती करू की त्यांनी राज्यशासनाला आदेशीत करावं की ,हा जो वाद उत्पन्न करण्यात आलेला आहे. त्यासाठी एक समिती स्थापीत करुन कोठे साईबाबांचा जन्म झाला आहे याचा शोध घेण्यात यावा.