औरंगाबाद | शहरात म्यूकरमायकोसिसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे हा संसर्ग थांबण्यासाठी लागणारे अम्फोटेरेसिनचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. शहरात या आजाराचे 274 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक इतरत्र कुठे इंजेक्शन मिळते का याचा शोध घेत आहेत. शनिवारी एक हजार इंजेक्शनची मागणी असताना रुग्णाला एकही इंजेक्शन वाटप करण्यात आले नाही.
रविवारी देखील इंजेक्शन मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगण्यात येते. औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण घटत असले तरी बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. एकीकडे इंजेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्या असल्या तरी, प्रत्यक्षात इंजेक्शन मिळत नसल्यामुळे सरकारच्या मोफत उपचाराच्या घोषणा पोकळ ठरत आहेत.
याबाबत एफडीएचे अधिकारी राजगोपाल बजाज यांनी सांगितले की, शुक्रवारी 130 इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र शनिवारी इंजेक्शन आलेच नाही त्यामुळे एकही हॉस्पिटलला इंजेक्शन दिले नाही रविवारी देखील इंजेक्शन मिळण्याची शक्यता कमीच आहे. सिग्माचे सीईओ महेश्वर अजय रोटे यांनी सांगितले की, आम्ही शनिवारी 56 इंजेक्शन ची मागणी केली होती मात्र मला एकही शिक्षण मिळाले नाही.
20 हजार इंजेक्शनची प्रतीक्षा :
औरंगाबाद जिल्ह्याने 20 हजार इंजेक्शनची ऑर्डर दिलेली आहे. मात्र अजूनही हे इंजेक्शन आलेले नाहीत. इंजेक्शन केव्हा मिळतील याची प्रतीक्षा सर्वजण करत आहेत.