दहिवडी | माण तालुक्यातील मरगळवाडी येथील कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेले जवान विजय नरबट व बापू कारंडे या सैनिकांची अनोख्या पद्धतीने बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धनगर समाजातील बाधवांनी बैलगाडी, मेंढरे, घोडे यांच्यासमवेत गंजीनृत्य करत स्वागत केले. या सैनिकांनी 17 वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा बजावली आहे.
या मिरवणुकीमध्ये पारंपारिक असणाऱ्या मेंढ्या व मेंढपाळ सुद्धा या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मरगळवाडी गावातील पारंपारिक अनेक वर्षांपासून सुरू असलेले धनगरी गंजी नृत्य सादर करण्यात आले होते. यावेळी गावातील महिलांनी भारतीय सैनिकांचे औक्षण केले. गावकऱ्यांनी सैनिकाच्या स्वागतासाठी रांगोळी काढली होती. या कार्यक्रमाच्या वेळी भारत माता की जय,’चा गजर करत जनतेमधून देशाभिमान जागृत केला.
यावेळी डॉ. प्रमोद गावडे,संचालक बाळासाहेब काळे, संचालक ब्रह्मदेव पोकळे, संचालक रामचंद्र झिमल, युवा उद्योजक आकाश माने उपस्थित होते. देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले. यावेळी गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाना मरगळे यांनी केले. आभार केराप्पा काळेल यांनी मानले.