कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने बकरी ईदच्या अनुषंगाने आज शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ईदच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने महत्पूर्ण माहिती देत आवाहनही करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सर्व बांधवांनी ईद घरोघरी साजरी करावी, असे आवाहन केले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीस डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, सागर बर्गे, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, मुकुंद चरेगांवकर, कराड शहर नगरपालिका व मलकापूर नगरपालिका यांचे नगरसेवक आणि शांतता कमिटी सदस्य तसेच मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी प्रांताधिकारी दिघे म्हणाले की, ईदच्या काळात शासनाच्या नियमानुसार उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाच्यावतीने कठोर कारवाई केली जाईल. गेल्या वर्षी कोरोना काळात सर्व सण कराड वासियांनी साजरे केले आहेत. आपल्या कराडच्या नागरिकांचा आदर्श राज्याने घेतला आहे.
यावेळी पार पडलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत शहरातील काही मान्यवरांनी आपले प्रश्न प्रशासनातील अधिकारी, पोलिसांपुढे मांडले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराड व मलकापूर शहराकडून सण, उत्सव काळात सामाजिक सलोखा ठेवण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. तर मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी यावेळी पालिका व पोलीस प्रशासनाकडे महत्वपूर्ण मागणी केली. कराड शहरात असलेल्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. त्यांची काळजी घ्यावी, अशी मागणी बर्गे यांनी यावेळी केली.