छावामुळे गावात अफवा! औरंगजेबाने पुरलेला खजिना लुटण्यासाठी असिरगडावर लोकांची तुफान गर्दी

0
3
Asirgad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट गाजत आहे. या चित्रपटांमध्ये औरंगजेबाने (Aurangzeb) बुऱ्हाणपूर (Burhanpur) येथील खजिना लुटल्याचे दाखवले आहे. त्यानंतर हा खजिना त्याने असिरगड किल्ल्यावर लपून ठेवण्याचे म्हटले जाते. हिच बाप लक्षात घेऊन असिरगड किल्ल्यावर (Asirgad Fort) जमिनीच्या उत्खननाला वेग आला आहे. आता लोकांमध्ये ही अफवा पसरली आहे की औरंगजेबाचा खजिना इथेच दडलेला असावा.

अफवेचे मूळ काय?

असिरगड किल्ल्याच्या परिसरात सध्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली माती जवळच्या शेतात टाकली होती. त्याचवेळी काही मजुरांना धातूची नाणी सापडल्याचा दावा करण्यात आला. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

याच काळामध्ये प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटात मराठ्यांनी बुऱ्हाणपूर लुटल्याचा उल्लेख ही झाला. यासंदर्भाने नागरिकांमध्ये ही अफवा पसरली की, मुघल सम्राट औरंगजेबाने आपला खजिना असिरगड किल्ल्यातच दडवून ठेवला होता. त्यानंतर अचानक हजारो लोकांनी किल्ला आणि परिसरात उत्खनन सुरू केले.

या अफवेचा परिणाम असा झाला की, असिरगड किल्ला आणि महामार्गाच्या बाजूच्या शेतांमध्ये मोठ्या संख्येने लोक खोदकाम करत आहेत. विशेष म्हणजे, अनेक नागरिकांकडे मेटल डिटेक्टरही आहेत. काहींना जुन्या धातूंच्या नाण्यांचा साठा सापडल्याचा दावा करण्यात येत आहे, त्यामुळे येथे गर्दी अधिक वाढत आहे.

बुऱ्हाणपूर आणि मुघल इतिहासाचा संदर्भ

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर हे मुघल साम्राज्याच्या काळात एक महत्त्वाची छावणी होते. उत्तरेतील दिल्ली आणि दक्षिणेतील दख्खन यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग होता. बुऱ्हाणपूर बंदरमार्गे विविध वस्तू दिल्लीला पाठवल्या जात. येथे मुघल साम्राज्याची मोठी नाणे टाकसाळदेखील होती. इतिहासकारांच्या मते, युद्धमोहिमा संपवून परतलेल्या सैनिकांनी बुऱ्हाणपूरच्या परिसरात मिळालेल्या संपत्तीचा काही भाग जमिनीत गाडून ठेवला असावा. याच आधारावर अनेकांना वाटते की, अजूनही किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात संपत्ती गाडलेली असू शकते.

दरम्यान, सध्या पसरलेल्या या अफवेमुळे स्थानिक प्रशासनही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे, प्रशासनाने नागरिकांना खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
इतिहासकार आणि तज्ज्ञांच्या मते, बुऱ्हाणपूर भागात अनेक ऐतिहासिक अवशेष असू शकतात, मात्र औरंगजेबाचा खजिना इथेच आहे, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. महत्वाचे म्हणजे, या प्रकरणाचा अभ्यास करून प्रशासनाने अनधिकृत उत्खनन थांबवण्याची तयारी केली आहे. जर काही ऐतिहासिक पुरावे हाती लागले, तर पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली अधिकृत संशोधन केले जाणार आहे.