सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या दुधेभावी येथील एका व्यक्तिमुळे कुपवाड वाघमोडेनगर येथील एका तरुणीला कोरोनाची लागण झाली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतून बेकायदेशीर प्रवास करून एका व्यक्तिने सांगली गाठली. त्याला देखील कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांमुळे सांगलीचा पुन्हा घात झाला आहे.
सांगलीत मुंबई, पुण्यातून येणाऱ्यांवर प्रशाासन व स्थानिक नागरिकांनी डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय जिल्हा बंदी देखील कडक झाली पाहिजे. कोरोनाचा फैलाव राज्यात वाढत चालला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई व पुणे या भागातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. जिल्हा बंदी असल्याने अनेकजण बेकायदेशीर प्रवास करत आहेत. विनापरवाना प्रवास करून आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे सांगलीला धोका निर्माण झाला आहे.