औरंगाबाद – औरंगाबादेत हवामानाच्या अचूक अंदाजसाठी सी बँड रडार डॉपलर बसविण्यास संदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून, सी बँड डॉपलर रडार संदर्भात आग्रही मागणी व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी औरंगाबादेत सी बँड डॉपलर रडार बसवण्या संदर्भात नुकतीच मान्यता दिली असल्याचे पत्र दिले आहे. भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून सी बँड रडार बसविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका सी बँड डॉपलर रडार निभावणार आहे. किमान तीनशे ते चारशे किलोमीटरचा भूभाग किंवा परिघ या रडारच्या नियंत्रणात येणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संदर्भात अचूक माहिती या रडारच्या माध्यमातून मिळणार आहे.
औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद हे जिल्हे पर्यावरणीय बदल, हवामान आणि तापमान वाढ या संदर्भात संवेदनशील असल्याचे टेरीच्या अहवालामध्ये नमूद केले आहे. सातत्याने हवामान तसेच वातावरणातील बदलाचा फटका बसून, मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्रासमोर मोठे संकट दशकभरापासून निर्माण झाले आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला आहे. दशकभरात नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. या संदर्भातही हवामानातील बदल आणि आर्थिक नैराश्य ही कारणे अनेक अहवालामध्ये स्पष्ट केले आहे
मराठवाडा भागामध्ये सातत्याने पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. केंद्र आणि राज्य सरकारने दहा वर्षांमध्ये किमान दहा हजार कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुदानावर खर्च केली आहे. सी बँड डॉपलर या रडारच्या माध्यमातून हवामाना बद्दलची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे या सर्व पार्शवभूमीवर मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा निर्णय मैलाचा ठरण्याची शक्यता आहे.