अमरावती प्रतिनिधी । अमरावती शहरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाला चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आनंदनगरात घडली. अभिजित ऊर्फ गोलू अरुण पार्डीकर असे जखमीचे नाव आहे. अरुणवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात हल्लेखोर आरोपी शंकर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर रामेश्वर गायकवाड यांचे जिल्ह्यातील माताखिडकी येथे असणारे घर यावर्षी जाळण्यात आले होते. याप्रकरणात अभिजित हा आरोपी होता. या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने शुक्रवारी शंकर व त्याचा मित्र अमोल वाघमारेने अभिजितवर चाकू हल्ला चढविला. या घटनेनंतर अभिजीतचा मित्र मिलींद मदतीसाठी घटनास्थळी धावून गेला, तोपर्यंत आरोपींनी पलायन केले. जखमी अवस्थेत अभिजितने खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी अभिजितला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एपीआय सतीश इंगळे यांनी अभिजितचा जबाब नोंदविल्यानंतर या हल्ल्या[प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या समय सूचकतेने या तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र या घटनेनं परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल आहे.