मुंबईतून आलेल्या एकास कोरोनाची बाधा, सांगलीत रुग्णांची संख्या ४ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे एका मुंबईतून आलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फिवर क्लिनीकमध्ये त्याची प्राथमिक तपासणी केली असता संशयास्पद वाटल्याने कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. दुधेभावीत बाहेरुन आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ३१ वर पोहोचली असली तरी सद्यस्थितीत चार रुग्ण आहेत. दुधेभावीत चाळीस वर्षीय व्यक्ती २७ एप्रिल रोजी मुंबई येथून आली होती. संबंधित व्यक्ती बाहेर गावातून आलेली असल्याने फिवर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली. या तपासणीमध्ये सदर व्यक्तीची लक्षणे संशयास्पद वाटल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर त्या व्यक्तीला बुधवारी रात्रीच मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. कोरोना तपासणीसाठी स्वॅब पाठविण्यात आला. त्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला असून सदरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. याशिवाय दुय्यम संपर्क बाधितांना कवठेमहांकाळ यथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संबंधित व्यक्तीचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी आहे. मात्र ही व्यक्ती दुधेभावी येथे आपल्या मामाकडे आली होती. बाहेरुन आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दुधेभावी व येडेनिपाणी या दोन्ही ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Leave a Comment