नगरपालिकेच्या घंटागाडीतून दारू वाहतूक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्हाधिकारी आदेशाचा भंग करून कोरोना बाधित कंटेन्मेंट झोनमध्ये नगरपालिकेच्या मालकीची सरकारी घंटागाडी वापरून दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव रामचंद्र जाधव याचेसह सतीश बबन मंडले, सुनील सावळाराम जाधव, सागर जाधव व राजभवन बिअर बारचे मालक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड विनिमयमन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार २८ एप्रिल रोजी दुपारी बाराच्या दरम्यान कोरोना बाधीत क्षेत्रांमध्ये राजभवन बिअर बारच्या आवारातून नगरपालिकेच्या शासकीय घंटा गाडीतून दारू साठा इतरत्र हलवण्यात येत होता. लॉकडाऊन असताना आणि दारू विक्रीचा परवाना नसताना राजभवन बिअर बार मधून दारूची वाहतूक केली जात होती. कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी नेमलेली आहे. असे असताना या परिसरात अन्य दुसरी घंटा गाडी (क्रमांक एम.एच.10 सीआर 2648) या गाडीवरील चालक सतीश बबन मंडले, सहाय्यक सुनिल सावळाराम जाधव व सागर जाधव यांनी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्याशी संगनमत करून दारू साठा इतरत्र हलवला.

नगरसेवक खंडेराव जाधव याने आपल्या पदाचाच गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी सांगली याचा आदेशांचा भंग करून कोरोना बाधित क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठीचे निमित्त साधून अनधिकृतपणे दुसरी घंटागाडी नेत दारू वाहतूक करण्यात आली. याबाबतची फिर्याद मुख्याधिकारी प्रज्ञा शंकरराव पोतदार-पवार यांनी दिली आहे.

Leave a Comment