हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भाविकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या या सोहळ्याच्या तयारीची छायाचित्रे भारताच्या इस्रो (ISRO) संस्थेने सॅटेलाईटच्या माध्यमातून टिपली आहेत. या फोटोंमध्ये महाकुंभमेळाव्याचा अद्भुत नजारा दिसत आहे.
हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) ने अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रह आणि रडारसॅटच्या मदतीने या महाकुंभ मेळाव्याची छायाचित्रे घेतली आहेत. NRSCचे संचालक डॉ. प्रकाश चौहान यांनी सांगितले की, रडारसॅट तंत्रज्ञानामुळे ढगाळ हवामानातही मेळाव्यातील दृश्य स्पष्ट दिसत आहेत. सॅटेलाईटच्या मदतीने उभारण्यात आलेले तंबू, नद्यांवरील पूल आणि विविध सोयी-सुविधांचे अचूक दिसत आहेत.
दरम्यान, महाकुंभमेळ्यात 45 दिवसांत सुमारे 40 कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाविकांसाठी 1.5 लाख तंबू, 3000 स्वयंपाकघरे आणि 1.45 लाख शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 99 पार्किंग लॉट्स आणि नव्याने उभारलेले स्नानघाट भाविकांच्या सेवेत आहेत. प्रशासनाने 26 हेक्टर क्षेत्र पुनर्प्राप्त करून 12 किलोमीटर अतिरिक्त स्नानघाट उभारले आहेत.
नव्या जिल्ह्याची निर्मिती
महाकुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराजमध्ये ‘महाकुंभ नगर’ नावाने नवीन जिल्ह्याची निर्मिती केली आहे. हा सोहळा त्रिवेणी संगमावर होत आहे. जिथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांचे संगम आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन इस्रोच्या सॅटेलाईटवरील फोटो वापरून सुरक्षा आणि संभाव्य दुर्घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्वाचे म्हणजे, महाकुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संपन्न होत आहे. आतापर्यंत या मेळाव्यात 8 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे. आता पुढील आठवड्यांत भाविकांची संख्या आणखीन वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.