हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यावर पिंपरी-चिंचवड मनपाचे कररूपी गोळा केलेले तब्बल ९८४.२६ कोटी रुपये अडकले होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेचे हे पैसे परत मिळवून देण्याची मागणी करत आज अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. त्यावर येस बँकेवरील आर्थिक निर्बंध लवकरच उठविण्यात येत असून, पुढच्या २ दिवसांत पिंपरी-चिंचवड मनपाचे पैसे त्यांना परत मिळतील असं आश्वासन ठाकूर यांनी दिल्याचं खासदार बारणे यांनी सांगितले.
‘येस’ बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील ‘येस’ बँकेवर गुरुवारी (५ मार्च) निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता बँकेच्या खातेदारांना महिन्याला अवघे ५० हजार रुपयेच काढता येत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेलादेखील पैसे काढता येणार नव्हते. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती कायम आहे. त्यामुळं खासदार बारणे यांनी आज संसद भवनात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतं पालिकेचे पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातात.
‘येस’ बँक खासगी असल्याचे माहिती असूनदेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने अधिक व्याजाच्या अपेक्षेने २०१७ पासून बँकेत दैनंदिन कर संकलनाची रक्कम ठेवण्यास सुरुवात केली. बँकेत पालिकेची सुमारे ९८४.२६ कोटी रुपयांची रक्कम आहे. त्यावर ८.१५ टक्के व्याज मिळत होते. परंतु, सरकारने बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे पालिकेला आता मोठा झटका बसला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होण्याची भीती व्यक्त होत असताना आता अनुराग ठाकूर यांच्या आश्वासनानंतर आता अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.