पालघर प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत पालघर तालुक्यातील सर्व गावांचा समावेश गृहनिर्माण विभागाने केला आहे. त्यामुळं नव्याने बांधल्या गेलेल्या गृहसंकुलातील सदनिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याबाबत निर्णय घेत शासनाने या योजनेत पालघरच्या समावेश करण्याचा निर्णय दिनांक १ नोव्हेंबर २०१९ घेतला होता. त्यानुसार संपूर्ण पालघर तालुक्याला या योजनेत समाविष्ट करत योजनेतील लाभांपासून वगळण्यात आलेल्या बोईसर, उमरोळी, सफाळे इत्यादी भागांमध्ये सदनिका विकत घेतलेल्या आणि अनुदानापासून वंचित झालेल्या सुमारे ४ हजार नागरिकांना आता दिलासा मिळताना दिसत आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान आवास योजनेमध्ये आधी केवळ पालघर शहराचा समावेश करण्यात आल्यानं तालुक्यातील वगळल्या गेलेल्या गावांमध्ये सदनिका घेतलेल्या नागरिकांना अनुदान मिळू शकत नव्हते. त्यातच साडे ४ हजार नागरिकांना शासनातर्फे वित्तीय संस्थेने दिलेल्या अनुदान परत घेतल्याने मोठया आर्थिक संकटाला येथील नागरिकांना सामोरे जावं लागलं होत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपली फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र आता पालघरमधील सर्व गावांचा समावेश केल्यानं या योजनेत नव्याने अनुदान प्राप्त करणाऱ्या अर्जदारांना या योजनेतील सहजगत लाभ मिळणे शक्य होणार आहे.