हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Yojana) ही मोदी सरकारची सरावात महत्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. मात्र आता याच PM किसान योजनेबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. पीएम किसान योजनेला ५ वर्ष पूर्ण होत असून आता या योजनेची केंद्रीय नीती आयोग समीक्षा करत आहे.
सरकार का घेत आहे PM किसान योजनेचा आढावा? PM Kisan Yojana
मोदी सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत पीएम किसान योजनेचे मूल्यमापन करण्याची योजना आखली आहे. NITI आयोगाशी संबंधित विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालय (DMEO) ने या योजनेच्या मूल्यमापनासाठी निविदा मागवल्या आहेत. या योजनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा कितपत पूर्ण केल्या आहेत याचे मूल्यांकन करणे हा त्याचा उद्देश आहे. यासोबतच त्याचा कृषी उत्पन्नावर किती परिणाम झाला? तसेच थेट फायदेशीर हस्तांतरण (DBT) ही शेतकऱ्यांसाठी आदर्श पद्धत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आहे.
त्याअंतर्गत देशातील 24 राज्यांमधील 5000 शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या 24 राज्यांमध्ये यूपी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, ओडिशा, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, पंजाब, आसाम, जम्मू आणि काश्मीर, त्रिपुरा, या राज्यांचा समावेश आहे. या योजनेत लाभ देताना काही गडबड झाली का? योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहचला की नाही, हे नीती आयोग तपासणार आहे. यासोबतच पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) सरकारी तिजोरीत वर्षाला ६०,००० कोटी रुपये खर्च येतो. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो. शेती करत असताना शेतकऱ्याना आर्थिक हातभार लागावा यासाठी मोदींनी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकार कडून दरवर्षी ६००० रुपये मिळतात. २००० रुपयांच्या ३ हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केले जातात. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत १६ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट वर जमा झाले असून आता १७ व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.