हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून देशाच्या 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळेच या अधिवेशनाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. महत्वाचे म्हणजे, हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित केले. याबरोबर, विरोधकांवर जोरदार टीका करत आणीबाणीचाही उल्लेख केला. यासह ’18वी लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल.’ असे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाचा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नवीन संसदेत ही शपथ घेतली जात आहे. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसदेत होत होती. या महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जगातील सर्वात मोठी निवडणूक अतिशय भव्य आणि अतिशय गौरवशाली पद्धतीने पार पडली ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.”
त्याचबरोबर, “उद्या २५ जून तारीख आहे. ज्यांचा भारताच्या लोकशाही परंपरांवर विश्वास आहे, त्यांच्यासाठी 25 जून हा दिवस अविस्मरणीय आहे. 25 जूनला भारताच्या लोकशाही वर काळा डाग पडून 50 वर्षे पूर्ण होतील. भारताची नवी पिढी हे कधीही विसरणार नाही की त्यावेळी राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली, भारताचे तुरुंगात रूपांतर झाले, लोकशाही पूर्णपणे दडपली गेली.” अशा शब्दात नरेंद्र मोदींनी 25 जून 1975 ला लागू झालेल्या आणीबाणीचा उल्लेख केला.
पुढे बोलताना, “विकसित भारताचा संकल्प पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण मिळून ती जबाबदारी पार पाडू आणि जनतेचा विश्वास आणखी दृढ करू” असे नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज सकाळी 11 वाजता सुरू झाले आहे. या अधिवेशनात नवीन खासदार 24 आणि 25 जून रोजी शपथ घेतील. दोन दिवसांच्या शपथविधी सोहळ्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू 27 जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील.