उदयनराजेंना जिंकवण्यासाठी मोदींची सभा कराडलाच का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर एकदाही भाजपच्या विचाराला थारा न दिलेला क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणजे सातारा. साताऱ्यात भगवा फडकला, फडकतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांचा, वारकरी संप्रदायाचा. पण धार्मिक रंग चढवलेला भगवा या जिल्ह्यानं कधीच आपल्या मातीत रोवून दिला नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, प्रेमालाकाकी, किसनवीर असे काँग्रेसी विचाराचे नेतृत्व आजवर सातारकरांनी दिल्लीला पाठवलं. १९९६ साली एकवेळ शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर सातारचे खासदार झाले. मात्र हा अपवाद वगळता सातारा कायम पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहिला. आता २०२४ ला सातारा फोडायचा डाव भाजपनं आखलेला दिसतोय. यासाठी उदयनराजेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवून खुद्द पंतप्रधान मोदी यांनी प्रचारात उडी घेत २९ एप्रिल ला कराड शहरात सभा (PM Modi Speech In Karad) ठेवलीय. पण मोदींची सभा उदयनराजेंना जिंकवू शकेल का? मोदींची सभा कराडलाच का घेतलीय? कराड भाजपला इतकं महत्वाचं का वाटतं? सातारा लोकसभेत कराडकर किंगमेकर कसे काय असतात? अन यंदा कराड दक्षिण, उत्तर, पाटण कोणाला खासदार बनवेल हेच आपण जाणून घेणार आहोत.

साताऱ्याचा खासदार कोण होणार हे कराडकर ठरवतात असं म्हटलं जातं. मागच्या काही निवडणुकांचे निकालहि हेच सांगतात. सुरवातीला सातारा लोकसभा आणि कराड लोकसभा हे दोन वेगवेगळे मतदार संघ होते. मात्र २००९ साली कराड लोकसभेचा काही भाग सांगलीला अन उर्वरित भाग सातारा लोकसभेला जोडण्यात आला. सध्या कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, सातारा, कोरेगाव, वाई असे विधानसभा एकत्र येऊन सातारा लोकसभा मतदार संघ बनतो. यामध्ये कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण येथील मताधिक्य सातारचा खासदार निवडण्यात नेहमी निर्णायक ठरत असल्याचं दिसून आलंय. नरेंद्र मोदी यांची सभा कराडलाच का याचं उत्तरही यातच लपलंय. प्रथम आपण कराड करांची मतं अन खासदारकीचं गणित काय ते पाहुयात तर २०१४, २०१९ पोटनिवडणूकचे निकाल पाहिले तर कराड भागातील उमेदवाराला नेहमी मोठं लीड मिळाल्याचं दिसून आलं आहे. कराडची जनता नेहमी पक्ष बाजूला ठेऊन स्थानिक उमेदवाराच्या पाठीमागे ठाम राहत असल्याचं मागचे निकाल सांगतात. यंदा मात्र पहिल्यांदाच प्रमुख उमेदवारांपैकी एकही उमेदवार कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण अशा तीनही भागातला नाहीये. त्यामुळं आता इथलं लीड जो उमेदवार आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी होईल जीत त्याचीच होईल असं सरळसरळ गणित आहे.

Narendra Modi Karad Sabha : Udayanraje Bhosale यांना मोदींची सभा कितपत फायदा करून देईल?

आता मोदींच्या सभेसाठी कराडचीच निवड का केली हे पाहुयात सातारा, वाई आणि कोरेगावच आपापलं गणित फिक्स आहे. विषय उरतो तो कराडचा. आणि म्हणूनच कराडकरांची मतं अन खासदारकी असं हे गणित अतिशय महत्वाचं असून भाजपनं याचीच गोळाबेरीज करत कराडवर आपलं लक्ष काँसंट्रेट केलंय. जेव्हा नरेंद्र मोदींची सभा घ्यायचा विषय आला तेव्हा ती कराडलाच घ्यायचं ठरलं कारण कराड करच सातारा लोकसभेत किंगमेकर आहेत. साताऱ्यात उदयनराजे, कोरेगावात शशिकांत शिंदे अन वाईमध्ये फिफ्टी फिफ्टी असं मताधिक्य राहील असा अंदाज राजकीय विश्लेषक लावतायत. पण कराड उत्तर, कराड दक्षिण मधील जनता काय भूमिका घेईल यावरच लोकसभेचा निकाल ठरेल असं बोललं जातंय. त्यामुळेच इतर कुठे सभा घेण्यापेक्षा कराड मध्ये सभा घेतली तर थेट विरोधकांच्या पारड्यात पडणारी मतं आपल्या पदरात पाडून विजयाचा मार्ग अधिक सुकर करण्याचा भाजपचा प्लॅन आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या २९ एप्रिल रोजीच्या सभेसाठी कराड हे लोकेशन भाजपनं फायनल केलं आहे.

आता मोदी यांच्या सभेचा उदयनराजेंना कितपत फायदा होईल हे पाहुयात

सातारा लोकसभेत भाजपकडून उदयनराजे तर शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सातारा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ साली पवारांनी उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट दिल अन प्रथम दिल्लीला पाठवलं. त्यानंतर २०१४ च्या मोदी लाटेतही उदयनराजे मोठ्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकत जायंट किलर ठरले. २०१९ च्या लोकसभेलाही उदयनराजेंनी घड्याळावर निवडणूक लढवत खासदारकीचं मैदान मारलं. पण अवघ्या ६ महिन्यात राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. यांनतर कमळ चिन्हावर पुन्हा पोटनिवडणूक लढवली अन त्यात घड्याळाच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव करत साताऱ्यात फक्त शरद पवार चालतात हे दाखवून दिलं. मान गादीला मत राष्ट्रवादीला असं म्हणत २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीनं जिंकली अन त्याचा प्रभाव राज्याच्या विधानसभा निवडणुकांवरही पडला.

आता २०२४ साली मात्र उदयनरजे यांनी जोरदार तयारी केलेली दिसतेय. शिवाय मागच्या निआवडणुकीत ज्यांनी पराभूत केलं ते श्रीनिवास पाटील निवडणूक रिंगणात नसल्यानं त्यामानानं उदयनराजेंसाठी लोकसभेचं मैदान जरा सोप्पंच बनलंय असही काहीजण म्हणतायत. पण असं असलं तरी मोदींच्या सभेची गरज पडते याचा अर्थ भाजपला अद्याप पुरेसा आत्मविश्वास नाहीये असाच होतो. एका बाजूला ४०० पार अशी घोषणा करणारे मोदी स्वतः ज्या प्रकारे प्रचार सभा घेतायत त्यावरून यंदा लोकसभेला भाजप बॅकफूटवर जाईल याची भीती त्यांना असल्याची चर्चाही आहे. यात आता मोदींच्या सभेचा उदयनराजेंना फायदा होईल का यावर बोलयच झालं तर त्याच उत्तर खूप काही फरक पडेल असे दिसत नाही असंच आहे.

मोदींच्या सभेचा उदयनराजेंना तितकासा फायदा होणार नाही याची कारण काय हे पाहू

पाहिलं कारण म्हणजे मुळात नरेंद्र मोदी यांच्या विषयी जनसामान्यांत असलेली नाराजीची लाट. पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली ज्याप्रकारे आश्वासने दिली ती त्यांनी पूर्ण केली नाहीत. अन २०१४ ला महागाई, भ्रष्टाचार यावर आवाज उठवणारे मोदी आता मात्र मूग गिळून शांत आहेत. २०१४ च्या प्रचारात महागाईवर मोदी एक शब्दही काढत नसल्यानं सामान्य जनता मोदींवर नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे मोदींनी सभेत कोणत्याही घोषणा केल्या तरी त्यांना पूर्वीप्रमाणे जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याच अलीकडे दिसत आहे.

याचं दुसरं कारण म्हणजे सातारा जिल्हा हा शाहू फुले आंबेडकर विचारांचा जिल्हा आहे. मोदी यांनी मागील काही वर्षात ज्याप्रकारे धार्मिक राजकारण सुरु केलय त्याला सामान्य लोक वैतागले आहेत. बेरोजगारी, गरिबी हे देशाच्या समोरचे ज्वलंत विषय असताना मोदींनी राम मंदिर हा निवडणुकीचा विषय बनवला. कामात अन माणसांत राम शोधणाऱ्या सामान्य माणसांना हेसुद्धा फारसं पटलेलं नसून एकीकडे महागाईमुळं लोकांचं जगणं मुश्किल झालेलं असताना आता मोदींच्या अशा अश्वासांच लोकांना कौतुक वाटेनासं झालं आहे. त्यामुळं मोदींच्या सभेचा उलटा परिणाम भाजपवरच होऊ शकतो अशी शक्यताही नाकारता येत नाही.

तिसरं कारण म्हणजे भाजपनं महाराष्ट्रात केलेलं फोडाफोडीचं राजकारण. सुज्ञ नागरिकांना भाजपचं हे फोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडलेलं नाहीये. एव्हाना भाजपचा पारंपारिक मतदारही यामुळे भाजपपासून काहीसा दुरावला गेलाय असं बोललं जातंय. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडी सीबीआय ची चौकशी लावली त्यांनाच भाजपने निवडणुकीत मिठी मारून तिकीट दिल, कवटाळलं हे सामान्य मतदारांना पटलेलं नाही. यातून आपली फसवणूक झाल्याची भावना लोकांची झाली असून मोदींविषयी सामान्य लोकांच्यात निगेटिव्ह प्रतिमा बनली आहे.

एका बाजूला असं असलं तरी दुसरीकडे नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात कोणत्या मुद्द्यावर बोलतात? सातारकरांची मनं जिंकण्यासाठी कोणती आश्वासनं देतात यावरही काही गणित अवलंबून आहेत. शिवाय यामुळे वातावरणनिर्मिती करण्यात उदयनराजे यशस्वी होऊ शकतात. तसेच स्वतः पंतप्रधानांनी शशिकांत शिंदे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर काही भाष्य केलंच तर राजकीय वातावरण त्यामुळं ढवळून निघू शकतं हे हि तितकंच खरंय. बाकी काय का असेना सातारा लोकसभेसाठी कराडकर हेच किंगमेकर असणारेत हे मात्र स्पष्ट आहे. तुम्हाला काय वाटत कराडची जनता कोणाला साथ देईल? नरेंद्र मोदी यांची सभा उदयनराजेंना पावेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा