‘कोरोनाच्या जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’; पंतप्रधान मोदींचा जाहीर सवाल

नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्र महासभेला हजेरी लावत उपस्थितांना संबोधित केलं. ‘कोरोना संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’ असा जाहीर प्रश्न पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित केला. कोरोना महामारीला तोंड देताना आज सगळं विश्वच गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जातंय. आज आपल्याला सर्वांनाच गंभीर आत्ममंथनाची गरज आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

या कठिण समयी एका प्रभावशाली रिस्पॉन्स टीमची गरज होती. मात्र, ‘या जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’ असा प्रश्नही पंतप्रधान मोदींनी यावेळी विचारलाय. संयुक्त राष्ट्राच्या प्रतिक्रियांमध्ये बदल, व्यवस्थांत बदल, स्वरुपात बदल ही वेळेची मागणी आहे, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.

भारताला ‘डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर’पासून कधीपर्यंत दूर ठेवाल?
संयुक्त राष्ट्रात बदलाची जी प्रक्रिया सुरू आहे, ती पूर्ण होण्याची भारतीय जनता दीर्घकाळापासून वाट पाहत आहे. ही प्रक्रिया कधी तरी लॉजिकल एन्डला पोहचेल का? या चिंतेत भारतीय आहेत. भारताला संयुक्त राष्ट्राच्या ‘डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर’पासून कधीपर्यंत दूर ठेवलं जाणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश, एक असा देश जिथं विश्वातील १८ टक्क्यांहून अधिक जनता राहते, एक असा देश जिथं शेकडो भाषा, अनेक पंथ, अनेक विचारधारा आहेत. ज्या देशानं कित्येक वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करणं तसंच अनेक वर्षांची गुलामी अनुभवलीय. ज्या देशात होणाऱ्या बदलांचा प्रभाव जगातील मोठ्या भागावर पडतो. त्या देशाला अखेर कधीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असा प्रश्नही यावेळी पंतप्रधानांनी विचारला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like