हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोहरादेवी येथील एका महंतासह कुटुंबातील चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून गावातील इतर 3 जणांसह एकूण 8 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते, त्यामुळं कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवार 22 फेब्रुवारीला वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर विरोधकांनी राठोडांवर टीकेची झोड उठवली. त्यावर आपण कोणालाही निमंत्रण दिले नव्हते, समर्थकांनीच गर्दी केली, असं म्हणत हात झटकले होते.
दरम्यान कोरोनाच्या काळात पोहरादेवीत गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केल्यामुळे संजय राठोड पक्षनेतृत्त्वाच्या मनातून उतरल्याची चर्चा आहे. विशेष महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या सगळ्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड यांचा राजीनामा घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’