सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज व रायेवाडी या भागात आज दुपारी अचानक जोरदार पाऊस पडल्याने गाळ उपसणारा पोकलॅड चक्क बुडला. या परिसराला पाऊसाने आज दुपारी एकच्या सुमारास सुमारे दीड तास पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकर्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नागज व रायेवाडी येथे दुपारी एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा पाऊस संततधार सुरू होता. या पावसामुळे नागज येथील बंधारा तुडुंब भरला आहे. तसेच ओढ्यातही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. पाऊसामुळे रायेवाडी तलावात पाणी आले आहे. रायेवाडी तलाव पुर्णपणे कोरडा पडल्याने शेतकरी तलावातील गाळ ऊपसा करुन शेतात घालत आहेत.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही नागज येथील शेतकरी मेळाव्यात रस्त्यावर कामासाठी तलावातील माती ऊपसण्याचा आदेश केला होता त्यानुसार तलावातील गाळ व मुरूम काढण्यात येत आहे. आजही गाळ मशिनच्या साहाय्याने उचलण्याचे काम सुरु होते. मात्र मशिन बंद पडल्याने अचानक जोरदार आलेल्या पावसाने तलावात पाणी आले व मशिन पाण्यात बुडाले.