सातारा | कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या वाढत आहे. कोरेगाव पोलिसांनी इव्हिनिंग वॉक आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत ३५ हजारांचा दंड वसूल करून २३ दुचाकी जप्त केल्या आहेत.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील व उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी पोलिस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक उपनिरीक्षक विजय जाधव, महादेव खुडे, राणी गायकवाड, जस्मीन पटेल, पूनम वाघ, धनंजय दळवी, किशोर भोसले, समाधान गाढवे, प्रमोद जाधव, अतुल कणसे, अमोल कणसे, प्रशांत लोहार, अजित पिंगळे यांच्यासह गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक अधिक बर्गे व त्यांच्या जवानांनी कारवाई केलेल्या आहेत.
काल तडवळे रस्त्यावर इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवर आणि आज कठापूर रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यात प्रत्येकी पाचशे याप्रमाणे ३५ हजारांचा दंड वसूल केला असून, २३ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर वाॅक करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. अनेकांनी वाॅक करणे बंद करत घरात बसणेच पसंत केले.