कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खाकी वर्दी घालून पोलीस असल्याचे भासवित दुचाकी लंपास करणार्या तोतयास कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. संबंधित आरोपी मुंबई रेल्वे पोलिसांकडील एका गुन्ह्यात भायखळा तुरुंगात होता. त्याला कराडातील गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. निलेश सुरेश चव्हाण (वय 29, रा. वडगाव हवेली, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडळी येथील राहुल रामचंद्र साळूंखे हे 9 डिसेंबर 2020 रोजी विजयनगर येथील बसथांब्यावर असलेल्या सलूनमध्ये दाढी करीत होते. त्यावेळी पोलिसाचा पोषाख परिधान केलेला एक युवक त्याठिकाणी आला. त्याच्या हातात फायबरची काठी तसेच पाठीवर सॅक होती. त्याने ती काठी व सॅक संबंधित सलुनच्या दुकानात ठेवली. तसेच तेथून जवळच असलेल्या आरटीओ कार्यालयातून बॅच आणायचा असल्याचे सांगून राहुल साळूंखे यांच्याकडे दुचाकी मागीतली. पोलीस दुचाकी मागत असल्यामुळे राहुल यांनी विश्वासाने दुचाकी त्याला दिली. मात्र, बराच वेळ थांबुनही संबंधित युवक परत आला नाही. राहुल यांनी आरटीओ कार्यालयात जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. पोलीस ठाण्यात जाऊनही राहुल यांनी वर्णन सांगून संबंधिताचा शोध घेतला. मात्र, संबंधित युवक हा पोलीस नसून त्याने बतावणी करून आपली दुचाकी लंपास केल्याचे साळूंखे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली.
दरम्यान, फसवणुकीच्या एका गुन्ह्यात निलेश चव्हाण हा मुंबई रेल्वे पोलिसांच्या अटकेत होता. त्याने विजयनगरमधील या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे कराड शहर पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group