औरंगाबाद : वटपौर्णिमेची पूजा करून घरी परतणाऱ्या महिलेचे एक लाख 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला शनिवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. पोदार यांनी दिले.
सिडको वाळूज महानगरातील नंदनकानन सोसायटीत राहणाऱ्या नीलिमा पोखरकर या वटपौर्णिमेची पूजा करून परिसरातील महिलांसोबत घरी पतरत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी नीलिमा यांच्या गळ्यातील सोन्याचे 1 लाख 44 हजारांचे गंठण हिसकावून पळून गेले.
या प्रकरणात एमायडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाला सदरील सोन्याचे गंठण विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर व सुनील पिंपळे या दोघांनी लांबवल्याची माहिती मिळाली. तसेच पिंपरी बाबा पेट्रोल पंपजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली.