सांगली । जिल्ह्यात आज अनोख्या पद्धतीची भाऊबीज पाहायला मिळाली. सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये पोलीस आणि वारंगणाचा भाऊबीज सोहळा रंगला. वारांगणाचे भाऊ म्हणून पोलीस उभे राहिले तर भाजपा महिला आघाडीने अग्निशामक जवानांसोबत आपली भाऊबीज साजरी केली. अनोख्या भाऊबीजेने वातावरण गहिवरले होते.
भाऊबीज सर्वत्र साजरी होत आहे. मात्र अनेक घटक असे आहेत की त्यांना भाऊबीज साजरी करता येत नाही. तर काही अडचणीमुळे आपल्या घरीही जाता येत नाही. सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीमधील वारांगणाची हीच अवस्था आहे. त्यामुळे आशा महिलांना हक्काचे भाऊ मिळावेत म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण सातत्याने प्रयत्न करत आहेत. आज भाऊबीजेचा अनोखा सोहळा वेश्यावस्तीतच साजरा झाला. यावेळी सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिंधकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलांचे भाऊ म्हणून हजेरी लावली. यावेळी पोलीस बांधवाना आपले भाऊ म्हणून ओवळताना अनेक महिलांना गहिवरून आले होते.
आपल्या अश्रूंना रोखत पोलिसांसमवेत वारंगणांनी आपली भाऊबीज साजरी करीत आपल्या भावना वाट करून दिली. या हृद्यस्पर्शी कार्यक्रमामुळे पोलिसही भारावून गेले. तर दुसरीकडे भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा माधुरी वसगडेकर यांनी बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या अग्निशमन विभागाच्या जवानासोबत आपली भाऊबीज साजरी केली. यावेळी जवानाना ओक्षण करत महिलांनी आजची भाऊबीज साजरी केली.