सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बँकेच्या 87 वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 25 हजाराचे भागभांडवल अन् 1 लाखाची ठेव ठेवण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेवून हा ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा ठराव रद्द करण्याचे आमच्या हातात नसल्याचे सांगताच मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली.
सभेच्या प्रारंभी माजी अध्यक्ष सचिन धोत्रे व राजेश कुंभारदरे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी तुकाराम बावळेकर यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना भाग भांडवल व ठेव बंधनकारक करण्याच्या ठरावाला आक्षेप घेवून निकष बदलण्याची मागणी केली. यावर संचालक राजेश कुंभारदरे यांनी तो ठराव रद्द करण्याचे अधिकार या वार्षिक सर्वसाधारण सभेस नाही. त्यासाठी रीतसर फोरम कडे तक्रार करावी लागेल. संचालक मंडळ त्यासाठी प्रयत्न करेल, असे सांगितले. यावरुन मोठा गोंधळ उडाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी संचालकांना व्यासपीठ सोडावे लागले. संचालकांचेही सभासदांनी न ऐकल्याने सभागृहात पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांच्या सूचनेनंतर सभा सुरळीतपणे सुरू झाली.
यावेळी बँकेचे अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, युसूफ शेख, सी. डी. बावळेकर, समीर सुतार,बाळासाहेब कोंढाळकर, संगीता तोडकर, वृषाली डोइफोडे, दिलीप रिंगे, बाबुराव कात्रट, नंदकुमार वायदंडे, इरफान शेख, अॅड. संजय जंगम, अॅड विजयकुमार दस्तुरे, मुख्य व्यवस्थापक फकीरभाई वलगे, अफझल सुतार, प्रभाकर कुंभारदरे, विजय नायडू, कुमार शिंदे, प्रशांत आखाडे किसन जाधव, अतुल सलागरे, रवींद्र कुंभारदरे, अशोक मळणे, सुनील पारठे, विजयकुमार भिलारे, अरूण शिंदे, सुरेश साळुंखे, राजेंद्र पवार यांच्यासह सभासद उपस्थित होते.