औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधील एका बंगल्यात आणि रो-हाऊस मध्ये अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू असलेला हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांच्या टाकलेल्या धाडीत १० जणांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वेश्या अड्ड्यावर अटक करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये शहरातील प्रसिद्ध प्रोझोन मॉलच्या मॅनेजरचा समावेश देखील आहे. ही कारवाई बीड बायपास रस्त्यावरील उच्चभ्रू वसाहतीत करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान मागील अनेक महिन्यापासून अत्यंत गुप्त पद्धतीने बीड बायपास परिसरातील राजेशनगर भागात एक बंगल्यात आणि रो-हाऊस मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून एका पथकाने शनिवारी राजेशनगर मध्ये सापळा रचला. सर्व प्रथम या रो-हाऊस मध्ये छापा टाकण्यात आला. यामध्ये अड्डा चालक संजय कापसे, ग्राहक म्हणून आलेला मॉलचा मॅनेजर मोहम्मद अर्षद , अमोल शेजुळ, ज्ञानेश्वर गराड, दलाल अजय साळवे, अड्डा चालवणारी आंटी यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी तेथून ३ वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात निरोधकांचा साठा जप्त केला. तसेच विदेशी दारूचे १० बॉक्स देखील सापडले आहेत.
तर दुसरी कारवाई ही त्याच भागात काही अंतरावर असलेल्या एका बंगल्यात करण्यात आली. या ठिकाणाहून पंटर नागवणे आणि एका आंटीला ताब्यात घेऊन एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सर्व आरोपींना आज म्हणेजच सोमवारी दुपारी न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.