हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या एक-दीड महिन्यात राज्यातील विविध भागांमधून लोकांना विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा चंद्रपूरमधील (Chandrapur) 41 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. या सर्व पोलिसांना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, यातील काही जणांना प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु यातील 9 पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी या पोलीस कर्मचाऱ्यांनी उपवास पकडला होता. याचवेळी त्यांनी भगर, खिचडी असे वेगवेगळे चमचमीत पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना थोडा त्रास होत असल्याचे जाणवू लागले. परंतु आज सकाळी हे 41 कर्मचारी ज्यावेळी कॅन्टीनमध्ये जेवणासाठी गेले त्याचवेळी त्यांना जास्त त्रास होऊ लागला. ही बाब लक्षात घेऊनच या सर्वांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. याचवेळी या कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सध्या विषबाधा झालेल्यांपैकी न कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जेवणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या सर्व कर्मचाऱ्यांना डी-हायड्रेशनमुळे विषबाधा झाली असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. कारण की, चंद्रपूरमध्ये कोणाचा पारा वाढत चालला आहे. याचा त्रास लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींना जाणवत आहे.
दरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील वडाळी गावात तर 125 भाविकांना भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे घटना घडली होती. यासह नागपूरमध्ये देखील भगर खाल्ल्यामुळेच 50 पेक्षा अधिक लोकांना विषबधा झाल्याचे समोर आले होते. मुख्य म्हणजे, गेल्या एक दीड महिन्यापासून वारंवार विषबाधा झाल्याच्या घटना समोर येत आहेत.