पुणे प्रतिनिधी |सुनील शेवरे ,
समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षेसाठी स्वत:ला वाहून घेतलेला घटक म्हणजे पोलीस. समाजाचे स्वास्थ टिकवून ठेवण्यात सर्वात मोठा वाटा उचलणारे पोलीस, हे नेहमीच आपल्या मदतीला धावून येतात. असे असले तरी त्यांच्या बाबतीत अनेक गैरसमज देखील तितकेच ठळकपणे दिसून येतात. हेच गैरसमज दूर करण्यासाठीच युवा स्पंदन संस्था व युवा वाद्य पथक व यांच्या वतीने ‘फ्रेंडशिप डे – विथ पोलीस’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सुमारे ४० युवक सहभागी झाले होते.
अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )
याविषयी बोलताना युवा स्पंदनचे चेतन धोत्रे म्हणाले की, ‘पोलीस हे नेहमीच आपल्याला चांगले कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. परंतू शिस्त लावताना अनेकदा त्यांना कठोर व्हावे लागते, त्यामुळे तरुणाईमध्ये अनेकदा पोलिसांच्या बाबतीत अनेक गैरसमज निर्माण होतात. यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टीकोन बदलतो. हा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांच्याबरोबर मुक्त संवाद होणे आवश्यक आहे. यातील पहिले पाउल म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये विविध महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. यामध्ये शिवाजीनगर, चतुश्रुंगी व नवी सांगावी येथील पोलीस अधिकाऱ्यासोबत संवाद साधण्यात आला. त्यामुळे तरुणाईला देखील पोलीसांचा दृष्टीकोन समजण्यास मदत झाली. या उपक्रमात चतुश्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक झेंडे मॅडम आणि सांगवीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भुजबळ आदी पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.
या उपक्रमाविषयी बोलताना चतुशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव म्हणाले की, अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने घेण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पोलीस हे नेहमीच प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून त्यांना मदत करण्यासाठी आजच्या तरुणाईने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या सभोवती घडणाऱ्या बेकायदेशीर घटनांची माहिती तरुणाईने दिल्यास सामाजाचे स्वास्थ्य राखण्यास निश्चितच हातभार लागेल.
या कार्यक्रमाचे आयोजन अभिषेक कदम , प्रवीण चव्हाण , अक्षय लांडगे, काजल फाकटकर, प्रशांत पाटील , प्रदीप डोंगरे यांनी केले होते.