सातारा | वाई तालुक्यातील मुंगसेवाडीचे पोलीस पाटील दीपक निकम, त्यांची पत्नी आणि चुलते यांना गावातील चौघांनी जुन्या वादातून जबर मारहाण केली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. सूरज बापूराव कासुर्डे, किरण बापूराव कासुर्डे, बापूराव साहेबराव कासुर्डे व आशा बापूराव कासुर्डे या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिपक निकम यांनी फिर्याद दिली आहे.
वाई तालुक्यातील मुंगसेवाडी या गावचे सरपंच विशाल रामचंद्र सुळके, ग्रामपंचायतीचे सदस्य शंकर तानाजी वरे, नामदेव शांताराम निकम, शशिकांत गुलाबराव घाडगे, गावचे पोलीस पाटील दीपक बबन निकम असे सर्वजण मुंगसेवाडी गावातील ओढ्याच्या पुलाजवळ गटारामध्ये असणाऱ्या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला असल्यामुळे तो कचरा कळकाच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू असताना विठ्ठल बापूराव कासुर्डे हा स्वत:ची चारचाकी गाडी घेऊन जात असताना त्याला काम संपेपर्यंत गाडी नेऊ नका, असे सांगण्यात आले.
याचा राग मनात धरून विठ्ठल बापूराव कासुर्डे याने त्याच रस्त्यावरून आला, त्यावेळी त्याने भाऊ किरण बापूराव कासुर्डे याला हातात लोखंडी बार घेऊन सोबत आणले, तर वडील बापूराव कासुर्डे हेही हातात काठी घेऊन घटनास्थळावर दाखल झाले.
सरपंच विशाल सुळके व इतर ग्रामपंचायत सदस्यांसमोरच गावचे पोलीस पाटील असलेले दीपक बबन निकम यांच्याबरोबर बाचाबाची करू लागले. पुढे या बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याने त्यात पोलीस पाटील यांचे चुलते दिलीप नारायण निकम (वय ६०) यांच्या डोक्यात लोखंडी बार घातल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यांना पाच टाके पडले आहेत, तर पोलीस पाटील दिपक बबन निकम आणि त्यांची पत्नी रेश्मा हे दोघेही जखमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba
Click Here to Join Our WhatsApp Group