सातारा | सातारा जिल्ह्यात रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानांचे सातारा, कराड, पाटण आणि कोयनानगर येथे संचालन करण्यात आले. यावेळी या जवानांसोबत सातारा जिल्ह्यातील पोलिसानी देखील संचालनामध्ये सहभाग घेतला. रॅपिड ऍक्शन फोर्सचे संचालन सातारा जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील तालुक्यात करण्यात येत आहे. शनिवारी कराड शहरात संचालन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील अजूनही दोन दिवस काही अतिसंवदेनशील भागात संचालन केले जाणार आहे. मंगळवार दि. 24 मे पर्यंत जिल्ह्यातील संवेदनशील तालुक्यात रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान व तेथील स्थानिक पोलिस संचालन करतील. या पथकाकडून भौगोलिक माहिती गोळा करून त्या ठिकाणी मोहल्ला कमिटी बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा दंगा सदृश परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करण्यासाठी या संचालनाची मदत होणार आहे.
शनिवारी दि. 22 रोजी सायंकाळी कराड शहरात रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान आणि पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गावर संचालन केले. यावेळी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, विजय गोडसे यांच्यासह अधिकारी व पोलिस कर्मचारी सहभागी झाला होते. कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये, यासाठी आम्ही संचालन करत असतो. आता रॅपिड ऍक्शन फोर्सला शहरातील माहिती असावी. या उद्देशाने ही मोहिम राबविल्याचे बी. आर. पाटील यांनी सांगितले.