पोलिसांची कामगिरी : कराड शहरात रो- हाऊसमध्ये 4 लाखांची चोरी करणाऱ्या तिघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरातील वाखाण रस्त्यानजीक पांडूरंग पार्कमध्ये असलेल्या रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून चार लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. सुरज कानू पवार (वय- २०), किशोर लाखन पवार (वय- ३०, दोघेही रा. मिलींदनगर-जामखेड, जि. अहमदनगर) व इरफान अजिज शेख (वय ३१, रा. मदीनापाटी, परभणी, जि. परभणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील वाखाण रस्त्यानजीक पांडूरंग पार्कमध्ये असलेल्या समर्थ रो हाऊसमधील अवधुत भरतसा कलबुर्गी हे ११ जुन रोजी ते कुटूंबासह परगावी गेले होते. १४ जुन रोजी ते घरी परत आले असता, घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अवधुत कलबुर्गी यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह पथकाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता.

दरम्यान, २१ जुन रोजी पोलीस कॉन्स्टेबल धिरज कोरडे व बाबुराव यादव हे पेट्रोलिंग करीत असताना ओगलेवाडी रस्त्यानजीकच्या पेट्रोल पंपावर त्यांना तिघेजण संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी वाखाण रोड येथील रो हाऊसमध्ये चोरी केल्याचे कबुल केले. आरोपींकडून सुमारे २ लाखाचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक गोडसे यांच्यासह हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, संजय जाधव, मारूती लाटणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment