साताऱ्यात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथील राजवाडा परिसरात नगरपालिका पार्किंगमध्ये अवैध पद्धतीने सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर मंगळवारी शाहुपूरी पोलीस ठाणेच्या गुन्हे पथकाने धडक कारवाई केली. यावेळी त्यांनी 1 लाख 11 हजार 672 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांना अटक केली आहे.

सोमनाथ लहु साठे (वय 29) रा. मल्हारपेठ सातारा, मुन्ना उर्फ मोहसिन सलीम बागवान (वय 32) रा. शनिवार पेठ, सातारा, चंद्रमणी धनंजय आगाणे रा. गणेश चौक कोडोली सातारा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील राजवाडा परिसरात असलेल्या जनावरांच्या जुन्या दवाखान्याच्या शेजारी नगरपालिका पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षात काही लोकांकडून अवैधरित्या मटका जुगार केला जात होता. यानातची माहिती पोलीस निरीक्षक पतंगे यांना मिळाली. यानंतर त्यांनी याची माहिती शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिली. तसेच त्यानंतर संबंधित ठिकाणी छापा कारवाईसाठी एक पथक तयार करुन पथकासह मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक छापा टाकला.

यावेळी त्यांना दोन इसम अवैध मटका जुगार चालवित असताना दिसुन आले. पोलीसांनी त्या दोन्ही इसमांना जागीच पकडुन त्या इसमांची व रिक्षाची झडती घेतली असता त्यांचेकडे अवैध मटका जुगाराचे साहीत्य मिळुन आले. पोलीसांनी दोन्ही इसमांकडुन रोख रक्कम, मटक्याचे पुस्तक, कार्बन, पेन, रिक्षा व दोन मोटारसायकली असा सुमारे 1 लाख 11 हजार 672 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात दोन बुकीसह आणखी एका मटका व्यवसायिक इसमाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीस नाईक ओंकार यादव यांनी फिर्याद दिली असून तिघांजणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.