खटाव तालुक्यातील वाळू ठेक्यावर पोलिसांचा छापा : 54 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात अंबवडे व सिद्धेवर कुरोली या दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यामध्ये २ डंपर, १ जेसीबी, २ ट्रॅक्टर, १ दुचाकी, ७ ब्रास वाळूसह एकूण ५४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून २ सरपंचांसह ७ जणांवर कारवाई केली आहे. तर ५ संशयिताना ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना शनिवारी अंबवडे येथे बेकायदेशीर वाळूउपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली.माहिती मिळाल्यानंतर त्यांनी इतर पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीने दोन ते तीन पथकांमार्फत अंबवडे येथील येरळा नदीच्या पात्रात रात्री पावणे बारा वाहण्याच्या सुमारास छापा टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी हवालदार दादासाहेब देवकुळे, भूषण माने, आण्णा मारेकर, संदीप शेडगे, सत्यवान खाडे, दीपक देवकर, गृहरक्षक दलाचे जवान देशमुख, यांच्यासह केलेल्या कारवाईत ५४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ज्यावेळी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली त्यावेळी त्या ठिकाणी वाळूने भरलेले २ डंपर, १ जेसीबी व एक दुचाकीसह अन्वर रशिद शेख (रा. वडूज), सुशीलकुमार दत्तात्रय डोईफोडे (रा. गोरेगाव), सोमनाथ आनंदराव भोसले (रा. वडूज), विलास दादा सुर्वे (रा. पिंपरी) यांना ताब्यात घेतले. नीलेश अशोक जाधव ऊर्फ कांदा (रा. वडूज) याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. अंबवडे या ठिकाणी नदीपात्रात सुरु असलेला वाळू उपसा हा वाहतूक किशोर बागल (रा.डांभेवाडी) यांच्या सांगण्यावरून केला जात होता. या कारवाईची नोंद हि पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक विपुल भोसले करीत आहेत.

त्यानंतर सिद्धेश्वर कुरोली येथे मोडे नावच्या शिवारात कालव्याजवळ ट्रॅकटरद्वारे बेकायदेशीरपणे वाळू वाहतुक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पथक पाठवून छापा टाकला. यामध्ये स्वप्नील इंदापुरे (रा. वडूज) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू हस्तगत केली असून या कारवाईचा अधिक तपास हवालदार आनंदा कदम करीत आहेत.