वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे फडणवीस म्हणाले होते, त्याचं काय झालं- बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या हाती सूत्र दिल्यास चार महिन्यात ओबीसी आरक्षण देईन नाहीतर राजकारणातुन संन्यास घेईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता काँग्रेसकडून फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला जात आहे. त्यातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर टीका करताना त्यांना त्यांच्या जुन्या घोषणेची आठवण करून देत टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी देखील स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही अशी घोषणा केली होती, मग त्याच काय झालं असा सवाल करत फडणवीसांच्या विधानाला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याने बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल आहे.

ते पुढे म्हणाले, सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करत असतात असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल.