कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील खराडवाडी येथे ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करू नका, असे बोलल्याचा राग मनात धरून पोलीस पाटलानेच हातात कायदा घेत घरात घुसून चक्क माजी सरपंचासह घरातील व्यक्तींना दांडक्याने मारहाण केली. लक्ष्मण निवृत्ती खराडे असे गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. तर या घटनेत परस्परविरोधी तक्रारी उंब्रज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माजी सरपंच लक्ष्मण खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस पाटील अविनाश उर्फ आनंदा सुरेश कुंभार, त्याचा भाऊ योगेश कुंभार, शहाजी तानाजी साळुंखे (सर्व रा. खराडवाडी), पंकज संभाजी मोरे (रा.सूर्याचीवाडी) व अन्य दोन जणांनी शुक्रवारी रात्री साडेआठचे सुमारास संगनमताने माझ्या घरात घुसून लाकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पत्नी जयश्री व मुलगा अक्षय यालाही मारहाण केली.
अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे खराडे कुटुंबीय पूर्णपणे हादरून गेले आहेत.
या प्रकरणी उंब्रज पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, अधिक तपास अमृत आळंदे करीत आहेत. दरम्यान, माजी सरपंच लक्ष्मण खराडे यांनी दमदाटी केल्याबद्दल उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जात असताना, तोरस्करवाडीजवळ अडवून मारहाण केली, अशी तक्रार खराडवाडीचे पोलीस पाटील अविनाश उर्फ आनंदा सुरेश कुंभार यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा