भिगवन येथून वाळू माफियांकडून २ पिस्टल व ४ काडतुसे जप्त; पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । भिगवण जवळील पोंदवाडी फाटा ता.इंदापूर येथुन पुणे ग्रामीण एलसीबी शाखेचे पथकाने तिघे वाळू माफियांकडून दोन पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील फरारी आरोपी यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविणे बाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, विदयाधर निचित, दत्ता तांबे, अक्षय जावळे यांचे पथक नेमण्यात आलेले होते.

दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी गुन्हे शाखेचे पथक भिगवण परिसरात रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना सदर पथकास राजू रोकडे व अमोल बोराटे रा.चिखली, पुणे हे दोघे इसम गावठी पिस्टलची विक्री करणेसाठी पोंदवाडी फाटा, पुणे-सोलापूर रोड लगत ता.इंदापूर जि.पुणे येथे येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदाराकडून मिळाल्याने पोलीस पथकाने पोंदवाडी फाटा येथे सापळा रचून संशयित तिघांना पकडताना पळून जाण्याचा प्रयत्नात असणारे आरोपी नामे १) राजू विठ्ठल रोकडे वय ३९ वर्षे रा.चिखली, मोरेवस्ती ता.हवेली जि.पुणे मूळ रा.कासळवाडी ता.पाथर्डी जि.अहमदनगर. २) अमोल दादासाहेब बोराटे वय २६ वर्षे रा.चिखली, मोरेवस्ती झोपडपट्टी ता.हवेली जि.पुणे मूळ रा.पिंपळगाव आळवा ता.जामखेड जि.अहमदनगर. ३) रवि भाऊसाहेब चाळक वय २१ वर्षे रा.दिघी, आदर्शनगर, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे (बुलेटस) असा एकूण किंमत रूपये १,००,४०० /- (एक लाख चारशे) रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आला. सदर आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तिनही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकामी भिगवण पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले आहे.

यातील आरोपी राजू रोकडे व रवि चाळक हे वाळू व्यावसायिक असून भोसरी, दिघी, चिखली परिसरात त्यांचा वाळू सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे. रात्रीचे वेळी वाळू व्यवसायानिमित्त फिरावे लागत असल्याने पिस्टल विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आरोपी अमोल बोराटे हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांचेविरूध्द पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात चिखली व अहमदनगर जिल्हयात जामखेड पोलीस स्टेशनला यापूर्वी खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट व खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

प्राथमिक चौकशीत आरोपी अमोल बोराटे याची जामखेड तालुक्यातील गावची शेतजमीन एका व्यक्तीने बळकावल्याने त्यांचेत भांडणे झाली होती. त्यामुळे गावातील घर सोडून तो चिखली येथे राहत होता. त्या रागातूनच त्याचा काटा काढणेसाठी त्याने पिस्टल जवळ बाळगत असल्याचे सांगितले आहे. आरोपींनी पिस्टल व काडतुसे कोठून आणली? याबाबतचा अधिक तपास भिगवण पोलीस स्टेशन करीत आहेत.