परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी येथे शुक्रवारी सैन्यभरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय झाल्याने त्यांना फुटपाथवर झोपण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे. योग्य नियोजन न झाल्याने हजारोंच्या संख्येने इथे आलेल्या उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे. पहील्याच दिवशी परिक्षार्थींना भर थंडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने हजारो उमेदवारांची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 4 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान 10 दिवस चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत रोज तीन जिल्ह्याच्या जवळपास पाच ते सहा हजार उमेदवारांना इथे बोलावण्यात येत आहे. पहिल्या दिवशी परभणी, बुलढाणा, नंदुरबार या तीन जिल्ह्यातील उमेदवारांना इथे बोलावण्यात आलं. हजारोंच्या संख्येने हे तरुण परीक्षार्थी इथे रात्री नऊ वाजल्यापासूनच दाखल झाले मात्र, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया ही रात्री 12 वाजता सुरू झाली. महत्वाचं म्हणजे इथे अनेक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने कुणाला रस्त्याच्या बाजूला, कुणाला फुटपाथवर तर कुणाला मैदानात थंडीत कुडकुडत उघड्यावरच थांबावे लागले.
यावेळी ना पाण्याची व्यवस्था ना लाईट अनेकजण मोबाईलच्या टॉर्च मध्ये आपले कागदपत्र जमा करत होते. तर काही विद्यार्थ्यांना उघड्यावर झोपल्याने पोलिसांच्या लाठीचा प्रसाद ही खावा लागलाय. रात्री 12 ते सकाळी सहा या वेळेत ही भरती होणार असल्याने भर थंडीत या तरुणांचे मोठे हाल होत आहेत. राज्यातील नऊ जिल्ह्यांसाठीच्या सैन्य भरती प्रक्रियेसाठी 65 हजार उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत.