औरंगाबाद | परराज्यातून कारमध्ये शहरात गांजा आणून विक्री करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी पहाटे सापळा रचून गजाआड केले. तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. हाती आलेल्या माहितीनूसार पोलिसांनी 37 किलो 300 ग्रॅम गांजा सह 12 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीकांत लक्ष्मण बनसोडे (वय 31), जगन्नाथ श्रीमंत लाटे (वय 26) दोघे रा. चौधरी कॉलनी चिकलठाणा अशी आरोपींची नावे आहेत. तर भिकन कडुबा रिठे रा. चिकलठाणा बाजारतळ व सनी हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. इनोव्हा कार मधून (एमएच 20 एए 4413) आंध्रप्रदेशातील दारा कोंडा इथून चार जण गांजा घेऊन शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलीस अमलदार ओम प्रकाश बनकर, वीरेश बने, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, दादासाहेब झारगड आदींच्या पथकाने केंब्रीज चौकात सापळा लावला होता. पोलिसांना पाहताच इनोव्हा कारचालकाने कार बीड बायपास वरून जुन्या व बंद असलेल्या रस्त्याने चिकलठाण्याकडे घेतली होती. पोलिसांनी कारचा पाठलाग करून गोपाल नगर येथे कारवली पोलिसांनी श्रीकांत बनसोडे व जगन्नाथ लाटे या दोघांना ताब्यात घेत कारची झडती घेतली असता 1 लाख 86 हजार पाचशे रुपयाचा 37 किलो 300 ग्राम गांजा मिळून आला.