सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
सातारा शहरातील जुना मोटार स्टॅन्ड मंडई परिसरात कय्युम राजेखान आतार (रा. सदरबझार सातारा) यांच्या मालकीचे आलेले चिकन सेंटर दि. 16/11/2021 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. त्यांनी घरफोडी करत त्यातील रोख रक्कम व काही मोबाईल हॅन्डसेट असे साहित्य चोरुन नेले होते. या चोरीचा छडा लावण्यात शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल हँन्डसेटसह रोख रक्कम, असा एकुण 11 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील सदरबझारमध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेची तक्रार कय्युम आतार यांनी पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकाऱ्यांना घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अभिजीत यादव आणि त्यांच्या पथकाने पुण्यातील चोरट्याचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेतला. त्यांना या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटबाबत तांत्रिक माहिती प्राप्त झाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. घरफोडी एका अल्पवयीन मुलाने केली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात चोरीस गेलेला 11 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार ए. आर. जगदाळे करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाळेचे सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पो. हेड.कॉ. इसन तडवी, लेलेश फडतरे, पो. ना. अमित माने, स्वप्रिल कुमार, ओंकार यादव, पो. कॉ. सचिन प्रचार, स्वप्रिल सावत यांनी केली आहे.